कॉंग्रेसचा ‘हात’ सोडणारी उर्मिला मातोंडकर आता ‘ शिवधनुष्य’ पेलणार ?

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसला रामराम केला आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिलाने निवडणूक लढवली होती. दरम्यान, आता उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना केलेल्या फोनमुळे उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नार्वेकर यांनी देखील आपल्याला मातोंडकर यांचा फोन आल्याचं सांगितले आहे. मात्र यावेळी राजकीय चर्चा न होता मैत्रीतून संवाद झाल्याचं त्यांनी सांगितले. ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या संबधामुळे फोनवर चर्चा झाल्याच नार्वेकर म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॉंग्रेसकडून भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारात उर्मिला यांनी मोदी सरकारविरुद्ध जोरदार प्रचार केला. मात्र, उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला.