सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई

श्रीनगर : सोशल मीडिया हे संवादाचं एक प्रभावी साधन आहे. मात्र त्याचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे देखील आहेत. जम्मू – काश्मिरमध्ये काही गटांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने चुकीची माहिती पसरवली जातीये. या अफवांचं पर्यावसन दंगलींमध्ये होऊन, याचा फटका येथील हजारो नागरिकांना बसतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जम्मू – काश्मिर पोलिसांनी घेतलाय. आता इथून पुढे सोशल मीडिया यूजर्सवर पोलिसांचं लक्ष असणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणे, कोणत्याही घटनेला जातीय रंग देणे असे प्रकार सुरु आहेत. पोलिसांनी पाच व्टिटर हँडल्सविरुद्ध या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे. तसेच, फेसबूक आणि व्हॉटसअ‍ॅपवर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्याप्रकरणी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आवश्यक कारवाई करता येईल. सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर पोलीस विशेष लक्ष ठेऊन आहेत.

२०१६ नंतर जम्मू आणि काश्मिरात काही समूहांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. काही पक्ष आपले राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा चुकीच्या माहितीमुळे जातीय संघर्ष होऊ शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...