रिक्षामध्ये घरगुती वापराचा गॅस भरणारे तिघे गजाआड, पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाची कारवाई

lpg

औरंंगाबाद : रिक्षामध्ये घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या तिघांना पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा मारून गजाआड केले. या कारवाईत पोलिसांनी दोन रिक्षा, घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंगसाठी लागणारी इलेक्ट्रीक मोटार, पाईप, वजनकाटा, रोख रक्कम असा एकूण २ लाख ५ हजार ८२० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

छावणी आठवडी बाजाराजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या रिक्षात गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक वामन बेले यांच्या पथकाने गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा मारला.

त्यावेळी शेख नुर शेख आयुब (वय ४०,रा.पडेगाव), अमोल एकनाथ भोलेराव (वय ३०, रा.भावसिंगपुरा) आणि सादीक हे तिघेही रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईएफ-५५०७) आणि रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईएफ-६००५) मध्ये अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस भरतांना मिळून आले. रिक्षात अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या तिघांविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक घायाळ करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या