पाटोदा येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई; दोन दिवसात १७ हजार दंड वसूल

बीड: कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे, मात्र याचे गांभीर्य लक्षात न घेत काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

लॉकडाऊन व संचारबंदी असली तरीही कोणतेही कारण नसताना रस्त्यावर नाहक फिरणाऱ्यांना आता पोलिसांकडून चांगलाच धडा शिकवला जात आहे. मागील दोन दिवसांत पाटोदा पोलिसांनी कोविड व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १०५ लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १७ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला. यासह विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २५ रस्तेबहाद्दरांच्या मंगळवारी अँटीजन चाचण्या केल्या असता १ जण पॉझिटिव्ह निघाला.

कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाकडून कडक लॉकडाऊन जाहीर केले असतानाही हिंडफिरे मात्र रस्त्यावर नाहक फिरत असल्याचे चित्र आहे. अशा मोकाट फिरणाऱ्यांवर आता पोलीस, नगरपंचायत व आरोग्य विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पाटोद्यातील मुख्य चौकात गत दोन ते तीन दिवसांपासून एपीआय महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पीएसआय पठाण यांच्या पथकाने कारवाई १०५ हिंडफिऱ्यांना दंड केला. यासह मंगळवारी २५ रस्तेबहाद्दरांच्या अँटीजन चाचण्या केल्या असता १ जण पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. तांदळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या