नैसर्गिक आपत्तीच्यावेळी कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई – राहुल द्विवेदी

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. तसेच पावसाळापूर्व काळात करावयाच्या सर्व उपाययोजना तात्काळ कराव्यात, जेणेकरुन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. मात्र, आपत्ती व्यवस्थापनात हयगय करणाऱ्या यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. जिल्हास्तरीय आणि प्रत्येक तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सन 2018 नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपमहावनसंरक्षक आदर्श रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडधे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, प्रत्येक यंत्रणांनी त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे जनजीवन विस्कळीत होणार नाही, जीवित वा वित्तीय मालमत्तेची हानी होणार नाही, यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वीच करणे गरजेचे आहे. त्याअ नुषंगाने बहुतांशी विभागांनी काम सुरु केल्याचे दिसून येत आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही प्रकारे नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हयगय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. दिलेल्या जबाबदाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास सक्त कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

You might also like
Comments
Loading...