लातुरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई; ७ हजार ४०० केले वसूल

लातूर: जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांची वाढती संख्या पाहता चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकीकडे रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांचा तुटवडा यामुळे येथील रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसत आहे. रुग्णांची वाढती संख्या बघून नवीन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहेत. गंभीर परिस्थिती असूनही येथील काही नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचे दिसून येत आहे, अनेक जण विनामास्क बाहेर मोकाट फिरत आहेत. अशा मोकाट फिरणाऱ्या लोकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहे.

शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यात १ हजार नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झाला असुन दिवसेंदिवस संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे येथील नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त पथक स्थापन करण्यात आले असून, या पथकाने सोमवारी विनामॉस्क व विनाकारण फिरणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई केली असून, ७ हजार ४०० रुपयाचा आर्थिक दंड वसूल करण्यात आला आहे. बेशिस्त लोकांना शिस्त लावण्यासाठी शेवटी हाच पर्याय समोर उरला असल्याने नागरिकांना यामुळे तरी परिस्थितीचे गांभीर्य समजेल.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून, तालुक्यात रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. तरीही काही नागरीक अत्यावश्यक खरेदीच्या नावाखाली लोक रस्त्याने बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी होत आहे. यामध्ये अनेकजण विनामॉस्क फिरत आहेत. त्यामुळे येथील नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाने, सोमवारी शहरातील गर्दीच्या बसवेश्वर चौकात बॅरिकेट्स लावून विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई केली असून यावेळी ७ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे विनामॉस्क फिरणाऱ्याना चांगलाच दणका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या