‘आर्थिक घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त करा’ ; छगन भुजबळांनी केला न्यायालयात अर्ज

‘आर्थिक घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त करा’ ; छगन भुजबळांनी केला न्यायालयात अर्ज

chagan bhujbal

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. आपल्याविरोधात याप्रकरणी लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली आहे. महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे आणि खासदार समीर भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयापुढे अर्ज सादर केला असून लवकरच यावर सुनावणी अपेक्षित आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवत विकास चमणकर यांच्या कुटूंबातील चौघांसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात एसीबीवर बेजबाबदारपणे गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवला आहे.

छगन भुजबळ यांनी सुरूवातीपासूनच महाराष्ट्र सदन प्रकरणात बिनबुडाचे आरोप लावल्याचा दावा केला होता. या प्रकरणातच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी मोठा काळ या कारागृहात घालवला होता. या प्रकरणात छगन भुजबळ यांना जामीन मिळाला. भुजबळ यांच्यासह अन्य चौदाजणांविरोधात दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नुकतीच मुंबई सत्र न्यायालयाने पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यात विकासक चमणकर कुटुंबियातील प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, प्रसन्न चमणकर, कृष्णा चमणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अरूण देवधर यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या