कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील संशयित न्यायालयाकडून फरार घोषित

वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर १९ जानेवारीला सुनावणी

कोल्हापूर : ज्येष्ठ साम्यवादी नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित पुण्याचा सारंग अकोलकर आणि कराड तालुक्यातील विनय पवार यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आले. तसेच संशयित आरोपी वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर १९ जानेवारीला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.

पोलिसांना सारंग अकोलकर, विनय पवार यांना पकडण्यात अपयश आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधून देणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तरीदेखील संशयित आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी झाले आहेत. यामुळे तपासयंत्रणेवर ना पानसरे समर्थक समाधानी आहेत ना बचाव पक्ष.

गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर १६ फेब्रुवारी २०१५ ला गोळीबार झाला होता. राज्य शासनाने एसआयटी कडे तपासाची सूत्रे सोपवली होती. तपासयंत्रणेने वारंवार तपास योग्य दिशेने चालला असून सर्व आरोपींना जेरबंद केले जाईल, अशा घोषणा वारंवार केल्या गेल्या पण त्या अर्धवटच राहिल्या.