#खातेवाटप : कोणते खाते कोणाकडे फक्त एका क्लिकवर !

टीम महाराष्ट्र देशा : बहुप्रतीक्षित असलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज झाला आहे. शपथ दिलेल्या सहाही मंत्र्यांना आज ठाकरे सरकारकडून खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या 16 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन असल्याने ठाकरे सरकारकडून तात्पुरत्या स्वरूपाच खाते वाटप केल असल्याचं दिसत आहे.

खाते वाटपात शिवसेनेकडे अतिशय महत्वाच्या अशा गृहखात्याची जबाबदारी आली आहे. तर ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांना नगरविकस, वने, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृदा, पर्यटन, संसदीय कार्य, या देखील खात्यांची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. तसेच शिवसेनेचे दुसरे मंत्री सुभाष देसाई यांना उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तर कॉंग्रेसकडे महसूल हे महत्वाचे खाते आले आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे या खात्याचा कारभार पाहणार आहेत. त्याशिवाय बाळासाहेब थोरात यांच्याकडे अन्य काही खात्यांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. उर्जा व अपारंपरिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यविकास खात्याचीही जबाबदारी थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कॉंगेसचे दुसरे मंत्री नितीन राऊत यांच्यावर सार्वजनिक बांधकाम, बालविकास, आदिवासी विभाग, वस्त्र उद्योग, मदत व पुर्नवसन, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आदी खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याकडे वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास, या खात्यांची जबाबदरी सोपविण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांना ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि अन्न व औषध प्रशासन या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान मुंबईमध्ये २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, नितीन राऊत या नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अशा पद्धतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र खातेवाटप न झाल्यामुळे ठाकरे सरकारला टीकांचा सामना करावा लागत होता.

महत्वाच्या बातम्या