सोलापुरात शिवशाही बसला भीषण अपघात; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात होती. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या शिवशाही एसटी बसला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली त्यामुळे हा अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की बसचा पूर्णतः चुराडा झाला आहे. हा अपघात शेटफळ गावाजवळ झाला आहे. या अपघातात मल्लिकार्जुन आबुसे या प्रवाशांंचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाला त्याक्षणी एसटीमध्ये एकूण १६ प्रवासी होते.

तसेच या अपघातात ११ जण जखमी झाले आहे. जखमींना तत्काळ जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एसटी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात जखमींना प्रत्येकी १ हजार, तर मयत मल्लिकार्जुन आंबुसे यांच्या कुटुंबीयांना १० हजार रुपयांची मदत दिली आहे.