शिरूर:अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

accident

शिरूर- मकरसंक्रांतीनिमित्ताने आळंदीहून देवदर्शन घेऊन शिरूरकडे येत असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीस डंपरची धडक बसल्याने पती-पत्नीसह त्यांच्या अकरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील कासारी फाटा येथे घडला.या झालेल्या दुर्दैवी अपघातात पोपट विठ्ठल गोरडे (वय ३७), शैला पोपट गोरडे (वय ३३, दोघे रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) हे जागीच ठार झाले. तर, उपचारादरम्यान पांडुरंग पोपट गोरडे (वय ११) या मुलाचा मृत्यू झाला.

यादरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोपट विठ्ठल गोरडे हे मूळ कान्हूर मेसाई गावचे असून नोकरीनिमित्त ते ढोक सांगवी येथे राहत होते. मकरसंक्रांतीच्या सुट्टीमुळे ते दुचाकीवरून कुटुंबासह आळंदी येथे देवदर्शनासाठी गेले होते. आळंदी येथून देवदर्शनाहून परत घरी येत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे-नगर मार्गावर असलेल्या शिक्रापूरजवळील कासारी फाटा येथे पोपट गोरडे यांच्या ताब्यातील दुचाकीला (एमएच १२ एमझेड १६५४) शिरूरच्या दिशेने येऊन कासारी फाट्याच्या बाजूने वळण घेत असलेल्या डंपरची (एमएच १२ ईएफ ९१९०) जोरदार धडक बसली. या वेळी दुचाकीचालक पोपट गोरडे व पाठीमागे बसलेली पत्नी शैला हे दोघेही रस्त्यावर पडले त्या दाम्पत्याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा पांडुरंग हा गंभीर जखमी झाल्याने त्याला शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.