४ लाखांची लाच स्वीकारताना एजंट एसीबीच्या जाळ्यात

पुणे  : पुरंदर तालुक्‍यात जमीन खरेदी – विक्री करणाऱ्या एजंट्सचे जाळे निर्माण झाले आहे. हे एजंट सर्वसामान्य नागरिकांना लाखो रुपयांना फसवतात. याबाबत वेळोवेळा अनेक तक्रारी आल्या आहेत. कारवाईमध्ये एका मोठ्या एजंटला सुमारे चार लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.

रामदास अप्पा खैरे ( वय ४५ वर्षे, रा. नाझरे कडेपठार, खैरेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे ) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. तक्रारदाराच्या जमिनीचा एक भाग खरेदी केला गेला होता. खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर साधे कुळ अशी नोंद आहे. हे कुळ रद्द करण्यासाठी मूळ मालक व इतर ११ व्यक्तींच्याविरुद्ध तक्रारदाराने ७० ब प्रमाणे सासवड येथील तहसीलदार कार्यालयात दावा दाखल केला.

या दाव्यात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी एजंट रामदास खैरे याने तक्रारदाराकडे सुमारे ८ लाख रुपयांची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लेखी तक्रार केली. ८ लाखांपैकी काही रक्कम प्राथमिक स्वरूपात देण्याचे ठरले. तक्रारदाराने आरोपी एजंट खैरे यास सासवड – हडपसर रस्त्यावरील हॉटेल आनंद येथे बोलावले त्यास ८ पैकी ४ लाख रुपये दिले.

याच वेळी या ठिकाणी साध्या वेषात सापळा लावून बसलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी कांचन जाधव आणि अशोक शिर्के तसेच इतर सहकाऱ्यानी त्यांना रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सासवड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आरोपी रामदास खैरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.