फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली अन् ब्रिटनमधील महिलेने घातला ३५ हजारांचा गंडा

जालना : फेसबुकवर मैत्री करून जालन्यातील एका व्यक्तीला ब्रिटनमधील महिलेने ३५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. ओमप्रकाश केशवराव शिंदे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते शहरातील जवाहर बाग परिसरातील रहिवासी असून त्यांनी याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ओमप्रकाश केशवराव शिंदे यांना ब्रिटनच्या रिबीका मॉरीस या अकाउंटद्वारे फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर सदर महिलेने शिंदे यांच्यासोबत चॅटिंग करून त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर मिळविला. यानंतर त्यांना फोन करून तुमचे एक पार्सल ब्रिटनहून दिल्लीला आले आहे, ते सोडवून घ्या, असे सांगितले. त्यासाठी ३५ हजार रुपये कस्टम ड्यूटी भरा असेही सांगितले. ओमप्रकाश शिंदे यांनाही यावर विश्वास बसला.

दरम्यान, ओमप्रकाश शिंदे यांनी मंठा अर्बन या बँकेतून आरटीजीएस करून ३५ हजार रुपये पाठविले. मात्र, पैसे भरल्यानंतर कुठलेही गिफ्ट मिळाले नाही आणि पत्रव्यवहारातूनही काहीच गिफ्ट आले नाही. यामुळे शिंदे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या