अभाविपच्या ५२व्या अधिवेशनाची रत्नागिरीत जय्यत तयारी

abvp-thumb

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५२ वे अधिवेशन येत्या बुधवारपासून (दि. २७ डिसेंबर) रत्नागिरीत होणार आहे. सन १९८६ मध्ये थिबा पॅलेस परिसरात झालेल्या यापूर्वीच्या अधिवेशनानंतर ३१ वर्षांनी रत्नागिरीत अधिवेशन भरत आहे. यावर्षीचे अधिवेशन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या खातू नाट्यमंदिरात होणार आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांसह मुंबई आणि गोव्यातील शंभर महाविद्यालयांमधील सुमारे एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

या तीन दिवशीय अधिवेशनात पहिल्या दिवशी ध्वजारोहण, उद्घाटन व नवीन प्रदेशाध्यक्ष व प्रदेश मंत्री यांची घोषणा आणि रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. तसेच लोकनृत्य, कला इत्यादींचे सादरीकरण होईल. या दिवशी विशेष अतिथी म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी शहरी माओवाद या विषयावर कॅप्टन स्मिता गायकवाड विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सामाजिक व शैक्षणिक विषयांवर प्रस्ताव व चर्चा होणार आहे. मुंबई विद्यापीठाविषयी काळी पत्रिका प्रकाशित केली जाणार आहे. सायंकाळी भव्य शोभायात्रा निघणार आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या मार्गाने निघणाऱ्या या शोभायात्रेमध्ये कोकणातील पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

अखेरच्या दिवशी (दि. २९ डिसेंबर) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात प्रा. मिलिंद मराठे (पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, अभाविप) महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी व के. वेंकटरमणी (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) सहभागी होणार आहेत. याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्था, महिला विमर्श, उद्योजकता आणि सेवार्थ विद्यार्थी आदी विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या अधिवेशनासाठी रत्नागिरीतील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नियोजनासाठी कंबर कसली आहे. अभाविपची ध्वजबांधणी, शोभयात्रेसाठी प्ले-कार्ड्स, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था इत्यादी व्यवस्थांची लगबग सुरू आहे. कार्यक्रमासाठी लागणारा सामाजिक उपक्रमाचा निधी समाजातून निर्माण व्हावा, यासाठी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते व व्यवस्थाप्रमुख सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.