ABVP- तर तावडेंना पुण्यात पाय ठेवू देणार नाही:अभाविप

abvp-thumb
पुणे. प्रतिनिधी
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोकर भरतीमध्ये चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने जागा भरल्या प्रकरणामध्ये उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांचे त्वरीत निलंबन करण्याची मागणी करत माने यांच्या कार्यालयावर आज अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने आज तीव्र स्वरुपाचे आक्रमक आंदोलन केले. भ्रष्टाचारी धनराज मानेना शिक्षणमंत्री विनोद तावडे पाठीशी घातल असून, चोवीस तासामध्ये निलंबन झाले नाही तर तावडेंना पुण्यात पाय ठेवू देणार नाही असा, इशारा अभाविपच्या वतीने यावेळी देण्यात आला.
या प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीनेही या नियुक्त्या संबंधित खात्याच्या अनुमतीशिवाय व बेकायदेशीर पद्धतीने केल्या गेल्याचा व बोगस व नियमबाह्य भरतीप्रकरणामध्ये माने व मंत्रालयातील अधिकार्‍यांविरोधात निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणानाची संपुर्ण चौकशी करुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये 6 एप्रिल 2017 रोजी माने यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. या संदर्भात निलंबनाचे आदेश देउनही तीन महिने झाले. तरी धनराज माने त्यांच्या खुर्चीवर आहे. पारदर्शी कारभाराचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने त्वरीत धनराज मानेला निलंबित करावे अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी नेता  राम सातपुते यांनी दिला.
पारदर्शी कारभाराची अपेक्षा करणारे सरकार भ्रष्ट अधिकार्‍याला पाठिशी घालत असल्याचे यानिमित्ताने निदर्शनास येत असल्याचे यातून सिद्ध होते.  येत्या 24 तासात निलंबनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास अभाविप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राम सातपुते यांनी दिला. यावेळी आंदोलकांमध्ये आणि पोलिसांत जोरदार झटापट झाली. धनराज माने यांच्या कार्यालयात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
धनराज माने (शिक्षण संचालक) यांची बाजू-
विधानसभेत जरी माझ्या निलंबनाचा ठराव पास झाला असला तरी त्या ठरावाची प्रत अथवा लेखी स्वरुपातील काहीही माझ्यापर्यंत अजून पोहोचले नाही. त्यामुळे मी अजूनही या पदावर कार्यरत आहे.