अभाविपचा संदीप फाउंडेशनला दणका,विद्यार्थ्यांना मिळणार पैसे परत

नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कॉलेज बंदला अखेर यश आले आहे . संदीप फाउंडेशन मधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीररित्या अतिरिक्त शुल्क आकारणी होत होती.अभाविपने केलेल्या यशस्वी आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना १५७८ रुपये परतावा देण्याचा निर्णय संदीप फाउंडेशनकडून घेण्यात आला आहे.

शुल्क अधिनियमन समितीने योग्य शुल्क नेमून दिलेले असतांना देखील हे अतिरिक्त शुल्क बेकायदेशीरपाने सर्व विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत होते. याची प्रचंड झळ पालकांच्या खिशाला बसत होती. हा संपूर्ण घोटाळा अडीच कोटींच्या घरात होता. या बाबत अभाविपने महाविद्यालय प्रशासनाला लेखी निवेदन देऊन हे शुल्क रद्द करावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेतले आहे त्यांना ते तात्काळ परत करावे अशी मागणी केली होती. वारंवार पाठपुरावा करून देखिल संदीप फांउडेशनच्या प्रशासनाने या बाबत कुठलीही कार्यवाही केली नसल्याने अभाविपच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी या अन्यायाविरोधात पाच तास ठिय्या दिला.

अखेर दिर्घकाळ चाललेल्या चर्चेअंती अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना हे शुल्क परत करण्याचे लिखित आश्वासन संस्थेच्या वतीनं देण्यात आल्यानंतर अभाविपने आंदोलन मागे घेतले. दिलेल्या आश्वासनानुसार विद्यार्थ्यांना शुल्काचा परतावा न मिळाल्यास अभाविप अधिक तीव्रतेने आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ