अभाविपचा आक्रमक चेहरा राम सातपुते आता युवा मोर्चा उपाध्यक्ष

पुणे: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून एक ते दीड वर्षांचा कालावधी असताना सर्वच राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे, केंद्र आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपने देखील आपल्या वेगवेगळ्या विंगमध्ये तरुण चेहऱ्यांना स्थान देण्यास सुरुवात केली आहे. यातीलच एक नाव म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे राम सातपुते, अनेक वर्ष विद्यार्थी परिषदेत काम केलेल्या राम सातपुते यांना भाजप युवा मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे.

abvp-leader-ram-satpute-appointed-as-state-vice-president-in-bjp-youth-wing

मुळचे बीड जिल्ह्यातील आष्टी येथील असणाऱ्या राम सातपुते यांच पुणे तसेच महाराष्ट्रात अभाविपच्या बांधणीमध्ये सक्रीय सहभाग राहिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर वेगवेगळी आंदोलने करत त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. वक्तृत्व आणि कर्तुत्वाची जोड असणाऱ्या सातपुते यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांना लिहिलेले खुले पत्र समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले होते. तेंव्हापासूनच त्यांना भाजपमध्ये सक्रीय करण्यात येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

उच्च शिक्षीत असणारे राम सातपुते यांचा रस्त्यावरील आंदोलनांसह सोशल मिडियारील सक्रीय सहभाग जमेची बाजू मानली जाते. जेएनयुमधील डाव्या पक्षांचा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांच्या विरोधात एफसी कॉलेजमधील आंदोलन, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कडाडून विरोध करण्यात देखील सातपुते यांचा पुढाकार चर्चेचा विषय बनला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर वेळी आपल्याच पक्षाच्या सरकार विरोधात सातपुते यांनी आंदोलन देखील छेडल्याच पहायला मिळाल. दरम्यान, आता एका सामन्य कुटुंबातून येणाऱ्या सातपुते यांच्या पक्षाने मोठी जबाबदार सोपवली आहे, ती सार्थ ठरवण्यात ते कितपत यशस्वी होतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.