पुणे : कमवा आणि शिका योजनेत घोटाळा ; अभाविपच्या माजी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत भ्रष्टाचार करून विद्यार्थ्यांनीच पैसे लाठ्ल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी अभाविपच्या माजी कार्यकर्त्यावर चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई (शिक्षक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी याप्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात अमोल भानुदास मगर (रा.मारवाड ता.माळशिरस), सागर तानाजी काळे (रा.पळसदेव ता.इंदापूर) आणि किरण गायकवाड (रा.बारामती) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कमवा व शिका योजनेत भ्रष्टाचार करून विद्यार्थ्यांनीच पैसे लाठ्ल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तीन लाख ४६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील कमवा शिका योजना राबवण्यात येते या योजनेंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थी या योजनेत काम करत असतात.सदर आरोपी हे योजनेत काम करत नसताना देखील काही विद्यार्थांची नावे विद्यार्थी म्हणून टाकले. त्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकले. त्यानंतर ते पैसे रोख स्वरूपात घेतले. योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना मानधन वाटप करताना आर्थिक अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती केली होती. या समितीच्या अहवालानंतर ही कारवाई झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सागर तानाजी काळे हे प्रतिष्ठित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे माजी पदाधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच यामध्ये विद्यापीठ प्रशासनातील काही लोक यामध्ये सामील असल्याची चर्चा विद्यापीठात चालु आहे.