fbpx

अमरनाथ हल्ल्याच्या मास्टरमाईंटला कंठस्नान

श्रीनगर : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलसह एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. श्रीनगरमधील नौगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत इस्माईल मारला गेला आहे.

‘पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू इस्माईल आणि त्याच्या साथीदाराला नौगाममध्ये ठार मारण्यात आलं. सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे.’ असं जम्मू आणि काश्मिर पोलिस अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आलं. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा अबू इस्माईल हा सूत्रधार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. अबू इस्माईलसोबतच पाकिस्तानचा रहिवासी असलेला छोटा कासिमला देखील ठार करण्यात आले आहे.

अमरनाथ यात्रेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 19 जण जखमी झाले होते. अबू इस्माईल हा गेल्या वर्षभरात खात्मा झालेला चौथा कुख्यात दहशतवादी आहे. बुरहान वाणी, सब्जर भाट, अबू दुजाना यांना गेल्या वर्षभरात कंठस्नान घालण्यात आलं होतं.