fbpx

सरकारचे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न अन् मुस्लिम आरक्षणासाठी टाळाटाळ – अबू आझमी

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. दरम्यान सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करते आणि मुस्लिम आरक्षणासाठी टाळाटाळ करते, असा आरोप अबू आझमी यांनी केला.

मुंबई उच्च न्यायालयात आज (गुरुवार) मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाला मान्यता मिळताच, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुस्लीम आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. मागणी झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र उच्च न्यायालयाने सांगूनही मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यास फडणवीस सरकारने टाळाटाळ केली आहे.

इतकेच नव्हे तर मुस्लिम समाजाचे आमदार वारीस पठाण आणि अबू आझमी यांनी मुस्लिमांना आरक्षण देताना सरकारने भेदभाव केल्याचा आरोपही केला आहे.