fbpx

लोकसभेचा महासंग्राम : जाणून घ्या महाराष्ट्रातील २०१४ मधील सर्वात अटीतटीच्या लढतीविषयी

टीम महाराष्ट्र देशा : ७ एप्रिल २०१४ ते १२ मे २०१४ दरम्यान १६ व्या लोकसभेसाठी भारतात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. एकूण ९ टप्प्यात या निवडणुका झाल्या. यात ५४३ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. १६ मे २०१४ ला मतमोजणी करून निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होते.

या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागांसाठी ३ टप्प्यात मतदान घेण्यात आले होते.  यामध्ये  सर्वात अतिटतिची लढत हिंगोली लोकसभा मतदार संघात पाहायला मिळाली होती. या मतदार संघात हिंगोली जिल्ह्यातील ३, यवतमाळ जिल्ह्यातील १, तर नांदेड जिल्ह्यातील २ विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.

ही लढत कॉंग्रेसचे राजीव सातव आणि शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्यात होती. या लढतीत कॉंग्रेसच्या राजीव सातव यांनी सेनेच्या सुभाष वानखेडे यांचा फक्त १ हजार ६३२ मतांनी पराभव केला होता. राजीव सातव यांना ४ लाख ६७ हजार ३९७ मते पडली तर सुभाष वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार ७६५ मते पडली होती.

या निवडणुकीत सुभाष वानखेडे यांचा १६२२ मतांनी निसटता पराभव झाला होता. २००९ साली सुभाष वानखेडे हे विजयी झाले होते. विद्यमान खासदार असल्याने हा पराभव सुभाष वानखेडे यांच्या जिव्हारी लागला होता.

१६ मे २०१४ ला मतमोजणी झाल्यानंतर भाजप आणि मित्रपक्षांच्या ३३६ जागा निवडून आल्या होत्या. तर, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६० जागा तर इतर पक्षांना १४७ जागा मिळाल्या होत्या. इतिहासात प्रथमच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या रुपाने देशात पूर्ण बहुमताने निवडून येणारे गैरकाँग्रेस सरकार स्थापना झाले होते.

या निवडणुकीत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला होता. देशात कॉंग्रेसच्या फक्त ४४ जागा निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रातून कॉंग्रसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे फक्त दोनचं खासदार निवडून आले होते.

आता २०१९ च्या लोकसभा निवडणूक कॉंग्रेस पक्ष आपला आकडा वाढवण्यास प्रयत्न करेल यात शंका नाही. हिंगोलीतून राजीव सातव पुन्हा एकदा निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करतील पण सुभाष वानखेडे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं  ठरणार आहे. यावेळेही हिंगोलीत अत्यंत चुरशीची लढत होईल यात शंका नाही.