राज्यातील ‘लावणी’ कलावंतांनाही बसला ‘कोरोना’चा फटका, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

पुणे : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे सर्वच क्षेत्राला ‘कोरोना’चा फटका बसला आहे. यामध्ये शेती, उद्योग, सर्वसामान्य व्यक्तींना याचप्रमाणे राज्यातील ‘लावणी’ कलावंतांनाही या साथीचा चांगलाच फटका बसला आहे.

कोरोना’ने देशासह राज्यात देखील चांगलेच हात पाय पसरले आहे. तसेच कोरोना साथीचा तडाखा हा राज्यातील लावणी कलावंतांनाही बसला आहे. मार्च ते मे या 3 महिन्यात लावणी कलावंतांची वर्षभराची कमाई होत असते. पण करोनामुळे सगळ्या यात्रा-जत्रा कॅन्सल झाल्यामुळे खूप नुकसान झालं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या साथीमुळे या सर्व लावणी कलावंतांचे मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यात होणारे नियोजीत शोज रद्द झाले. त्यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या तीन हजार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. म्हणूनच शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माया कुटेगावकर, चैञाली राजे, अर्चना जोगळेकर या आघाडीच्या लावणी कलावंतांनी मुख्यमंञ्यांकडे केली आहे. असे वृत्त ‘news 18 lokmat’ ने दिलं आहे.

राज्यात एका बाजूला कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनाचा संपर्क झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे.