अब्दुल सत्तारांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता कमीच :- रावसाहेब दानवे

औरंगाबाद : भाजपला 2019 च्या निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय डोक्यावर केस ठेवणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. सत्तार यांना आधीच डोक्यावर केस कमी आहेत, आणि पुढील निवडणुकीतही आम्हीच जिंकणार असल्याने पुन्हा त्यांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता  नसल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. सत्तार आणि दानवे हे दोघेही ‘बाल की खाल’ खेचतायेत अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.

वेगवेगळ्या पक्षात असले तरी निवडणुकीत एकमेकांना मदत करुन शेजार धर्म पाळणाऱ्या सिल्लोडचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दानवे-पिता पुत्रांना पुढच्या वेळी पराभूत करणारच असा दावा करत जालना लोकसभेसाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना पाठिंबा देत सत्तार यांनी दानवे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

दानवे विरोधाची धार अधिक तेज करण्यासाठी अब्दुल सत्तार जनआक्रोश मोर्चातून भाजपसह रावसाहेब दानवे यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, पैठण, सोयगाव तालुक्यात सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात रावसाहेब दानवे यांनाच कॉंग्रेसने लक्ष्य केल्याचे दिसून आले. जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पैठण येथील आक्रोश मोर्चात सत्तार अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. जालन्यातून रावसाहेब दानवे यांचा पराभव निश्चित आहे, आम्ही शिवसेनेच्या अर्जून खोतकर यांना निवडून आणणार असा दावा सत्तार यांनी आपल्या भाषणातून केला.

जालन्यातून मीच निवडूण येणार
सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील पुढचा आमदार भाजपचा झाला पाहिजे यासाठी रावसाहेब दानवे व त्यांचे आमदार पुत्र संतोष दानवे तालुक्‍यात बैठकावर बैठका घेत आहेत. त्यामुळे सत्तार यांनी देखील रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याची भाषा सुरु केली आहे. पैठणमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल (ता. 16) दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना दानवेंनी सत्तार यांना प्रत्युत्तर दिले. जालना लोकसभा मतदारसंघातून आपला पराभव कुणीच करू शकत नाही, मीच पुन्हा निवडून येणार असा दावा करतांनाच सत्तार यांनी डोक्यावरवरचे केस न काढण्याच्या निर्णयाचीही खिल्ली उडवली. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर झालेल्या सगळ्या निवडणूकीत आम्ही जिंकलो आणि नंबर एक ठरलो. 2019 मध्येही भाजपच निवडून येणार आहे, तेव्हा आधीच डोक्यावरवर कमी केस असलेल्या अब्दुल सत्तार यांना पुन्हा केस येण्याची शक्यता नसल्याची टिका केली.

सत्तार आणि दानवे यांच्यातील कलगीऱ्याचे निरनिराळे अर्थ लावले जात आहेत. काहींच्या मध्ये या दोघांमध्ये आता पहिल्या सारखे संबंध राहिलेले नाहीत. तर दोघेही बिनसल्याचा दिखावा करत आहेत, निवडणुका आल्या की पुन्हा एकत्र येऊन एकमेकांना मदत करतील असा अंदाज भाजप आणि कॉंग्रेस असे दोन्हीकडचे कार्यकर्ते खाजगीत व्यक्त करतांना दिसतात.