fbpx

‘मोदी-शाहची भाजप हटाव’; ‘आप’ची नवी भूमिका

टीम महाराष्ट्र देशा – आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात २०१९ लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपचे या लोकसभा निवडणुकीत मोदी शहांचा भाजप सत्तेतून हटवणे हेच मुख्य आव्हान आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचारी सरकारविरुद्ध आम आदमी पार्टीने देशभर निवडणूक लढवली. दरम्यान आम आदमी पार्टी मोठ्या बहुमताने दिल्ली विधानसभेत निवडून आली. जनतेने केंद्रात भाजप पण दिल्लीत केजरीवाल ही भूमिका घेतली. मात्र पुढील चार वर्षात केंद्रातील भाजप सरकारने अत्यंत द्वेषपूर्ण आणि सूड भावनेने , तपास यंत्रणा ताब्यात घेत विविध खोटे आरोप लावत, तर कधी नायब राज्यपालांच्या मार्फत आडकाठी करत आप सरकारला काम करू न देण्याचा चंग च बांधला.

या त्रासाला पुरून उरत दिल्ली मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले जाईल असे काम शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केले. आज त्याचे अनुकरण महाराष्ट्रात नाशिक, मुंबई , पुणे महानगरपालिका करू पाहते आहे. या सर्व प्रवासात केंद्रातील मोदी सरकारची वाटचाल ही लोकशाही मोडीत काढण्यासाठी चालू आहे असेच दिसून आले.

नोटबंदी सारखे मनमानी निर्णय घेत मोदी सरकारने देशाचे कंबरडे मोडले आहे. देशामध्ये जाती, धर्मावरून दुफळी निर्माण करावयाचा प्रयत्न भाजप करते आहे. त्यामुळे आज भाजपा चा पराभव हेच मोठे आव्हान आहे. या मुळे आता पाच वर्षानंतर भाजप हाच लोकशाहीचा प्रमुख शत्रू म्हणण्याची वेळ आली आहे. मोदी शहांचा भाजप सत्तेतून हटवणे हा या लोकसभा निवडणुकीतील मुख्य आव्हान आहे .

दरम्यान, देशभरातील परिस्थितीमुळे आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात मत विभागणी टाळण्यासाठी लोकसभेसाठी उमेदवार उभे न करत, भाजप ला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे . पक्षाच्या हितापेक्षा राष्ट्रीय हित महत्वाचे मानत आप ने हा निर्णय घेतला आहे.

या लोकसभा निवडणुकी मध्ये भाजप ला हटवण्याच्या बरोबर रोजगार, शेतकरी आत्महत्या, शिक्षण , आरोग्य हे प्रश्न राजकीय पटलावर यावेत या साठी जनजागृती चे काम आम आदमी पार्टी करेल. भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई आणि दिल्लीतील शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील कामाचे ‘आप मॉडेल’ लोकांसमोर घेऊन जात आम आदमी पार्टी येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लढवेल.