आमदार नसल्याची सबब देत चौथ्या वर्षीही आमसभेच्या हालचाली नाही!

सोलापूर : ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तालुकास्तरावर पंचायत समितीची आमसभा हक्काची व्यासपीठ मानली जाते. मात्र, आमदार नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने सलग गेली तीन वर्षे आमसभा घेतली नाही. यंदाही याविषयी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे आमसभा घेण्याची मागणी होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या एक महिना आधी पंचायत समितीची आमसभा घेण्याचा प्रघात आहे. आमसभेत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मांडल्या जाणाऱ्या प्रश्नांना अर्थसंकल्पात स्थान मिळावे, हा हेतू असतो.

ग्रामीण जनतेला अडचणी मांडण्याची यामुळे संधी मिळते. पण गेल्या तीन वर्षांपासून उत्तर सोलापूर तालुक्याची आमसभा न झाल्याने ती संधीच नाकारली गेली आहे. स्थानिक विधानसभा सदस्याच्या अध्यक्षतेखाली आमसभा बोलवावी, असा राजशिष्टाचार आहे . तालुक्याचे तीन विधानसभा मतदारसंघांत विभाजन झाले आहे. २४ गावे मोहोळ, नऊ गावे सोलापूर दक्षिण, दोन गावे सोलापूर उत्तर मतदारसंघाला जोडली आहेत. अनुक्रमे रमेश कदम, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे या मतदारसंघांचे आमदार आहेत. आमदार कदम हे तुरुंगात आहेत. ते कारण पुढे करत प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून आमसभाच बोलावली नाही. ते नसले तरी इतर दोन आमदार आहेत. तरीही प्रशासनाने आमसभा घेणे टाळले.

गेल्या काही वर्षांपासून माहिती अधिकारामुळे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. आमसभेत अधिकारी उघडे पडतात. त्यामुळे आमसभा टाळण्याकडे प्रशासनाचा कल दिसतो. विशेष म्हणजे गतवर्षीही तालुक्यातून अामसभेची मागणी होती. मात्र, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बोलावलेल्या सभेला सर्व अधिकारी उपस्थित होते. त्याऐवजी आमसभा घेण्याचे प्रयत्न करायला हवे होते.

Loading...