आमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार

मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या अभिनेता आमीर खान सद्या ‘दंगल’मुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘दंगल’च्या निमित्तानेच आमिर आता कोल्हापूरच्या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे. कोल्हापूरच्या तालमीतील पैलवानांनी आमीरला आखाड्यात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मोतीबाग तालमीचे वस्ताद आणि ‘रुस्तुम-ए-हिंद’ दादू चौगुले यांनी आमिरला निमंत्रण दिलं असून ते आमीरने स्वीकारलं आहे. आमीर खान येत्या 19 डिसेंबरला कोल्हापूरला जाणार आहे.

दंगल सिनेमात कोल्हापूरचे नामांकित मल्ल आणि ‘रुस्तुम-ए-हिंद’ दादू चौगले यांची भूमिका आहे. रिअल लाईफमध्ये पैलवान असलेले दादू चौगुलेंनी दंगलमध्येही खऱ्याखुऱ्या पैलवानाची भूमिका साकारली आहे.

मोतीबाग तालमीत केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातील मल्ल कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी येतात. मोतीबाग तालीम  देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आमीर खाननेही या आखाड्याला भेट देण्याची विनंती दादू चौगुले यांनी केली. आमीर खानने पारंपारिक कुस्ती पाहावी, अशी त्यांची इच्छा आहे.

कोल्हापुरात अजूनही मातीतील कुस्ती खेळली जाते. मातीत दूध, तूप, हळद मिसळून ही माती रोगप्रतिकारक बनवली जाते.