महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही : आमिर खान

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नाही, हे विधान आहे अभिनेता आमिर खानचे.शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता महाराष्ट्रात सगळ्यांना बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे. त्यामुळे कोणताही निर्माता स्पर्धा करणार नाही, अशी प्रतिक्रिया आमिरने दिली आहे. लहान मुलांमधील स्थूलपणाविषयी वेबसाइट लाँचिंगच्या पत्रकार परिषदेत आमिर खान बोलत होता.

नेमकं काय म्हणाला आमीर ?
ठाकरे सिनेमा प्रदर्शित होत असलेल्या दिवशी अन्य चित्रपटांचे प्रदर्शन निर्मात्यांनी पुढे ढकलण्याबाबत विचारले असता तो म्हणाला, प्रत्येक निर्मात्याला आपला चित्रपट चांगल्या दिवशी प्रदर्शित व्हावा असेच वाटत असते. त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणताही मोठा चित्रपट येणार असेल, त्यावेळी आपला चित्रपट क्लॅश व्हावा असे कोणत्याही निर्मात्याला वाटणार नाही. महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही. त्यामुळे या दिवशी कोणाही निर्मात्याला आपला चित्रपट क्लॅश करावासा वाटणार नाही. बाळासाहेबांवरील चित्रपट महाराष्ट्रात प्रत्येकालाच पहावासा वाटणार, त्यामुळे कोणताही निर्माता आपला चित्रपट या दिवशी प्रदर्शित करू इच्छिणार नाही, असेही आमिरने सांगितले.