सहारा समूहाच्या अँबी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सोमवारी लोणावळा येथे असलेल्या सहारा समूहाच्या अँबी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अँबी व्हॅलीच्या लिलावाची बोली ३७ हजार ३९२ कोटीपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना मोठा धक्का बसला आहे. अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यात यावा म्हणून सहारा समुहाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे स्पष्ट आदेश १० ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिले होते.