केजरीवालांना आणखी एक धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी

टीम महाराष्ट्र देशा – आम आदमी पक्षाला एका आठवड्यात दुसरा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी माजी पत्रकार असलेल्या आशुतोष यांनी वैयक्तीक कारण देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता आशुतोष यांच्या पाठोपाठ आशिष खेतान यांनी सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

आशीष खेतान यांनी २०१४ मध्ये पक्षाकडून लोकसभेची निवडणुक लढवली होती. आशुतोष यांच्याप्रमाणेच आशीष खेतान हे देखील पत्रकारीता सोडून राजकारणात आले होते. अनेक दिवसांपासून खेतान हे पक्षाच्या कामकाजात सहभागी होत नव्हते, आशीष खेतान आणि आशुतोष दोघांनीही १५ ऑगस्टलाच राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.

‘आप’चे नेते खेतान यांनी वकिलीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राजकारणापासून थोडं दूर होत आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे. खेतान हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. याआधीही खेतान यांनी दिल्ली डेव्हलपमेंट कमिशनच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची या कमिशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष खेतान यांना नवी दिल्ली लोकसभा जागेसाठी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र पक्ष या निवडणुकीसाठी एका नव्या चेहऱ्याला संधी देणार आहे. यामुळेच नाराज झालेल्या खेतान यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे.

 

केरळसाठी देऊ केलेली युएईची ७०० कोटींची मदत केंद्र सरकारने नाकारली