आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या नेतेपदी निवड ; लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर

मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेते पदी आज निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा आज वरळी येथील वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल येथे सुरू आहे. यावेळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिवसेना नेते पदासाठी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण सभागृहात जल्लोष झाला. तसेच जोरदार फटाके वाजण्यात आले.

शिवसेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे मनोहर जोशी यांचे नेतेपद जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचं नेतेपद कायम असून यंदा एकनाथ शिंदेंना नेतेपद नाही. असे स्पष्ट करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे असे सांगितले.