fbpx

सुदृढ युवा पिढी घडविण्यासाठी मानसिक व मौखिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे – आदित्य ठाकरे

aaditya thakray

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे जीवनातील ताणतणाव वाढत चालला आहे. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर योग्य निदान होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रात मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी सारख्या आरोग्य सुविधा मिळणार असल्यामुळे त्याचा सामान्य माणसाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर मौखिक आरोग्य उत्तम असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्याचा आपल्या आहार पद्धतींवर प्रभाव पडतो. आरोग्यवर्धिनी च्या माध्यमातून दंत व मुखरोग आरोग्य सेवा जनतेला मिळणार आहेत. सुदृढ युवा पिढी घडविण्यासाठी मानसिक व मौखिक आरोग्य उत्तम असणे महत्वाचे असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आजार होऊन नयेत म्हणून म्हणून शाळांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आरोग्यवर्धिनी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री श्री. शिंदे तसेच श्री. ठाकरे यांनी हरिसाल, नंदुरबार येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
राज्यातील आरोग्य सोयी सुविधा बळकटीकरणासाठी चालू आर्थिक वर्षात १ हजार १२ आरोग्य उपकेंद्रे, ग्रामीण भागातील ४७९ व शहरी भागातील १२५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ४ आकांक्षित गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार व इतर १५ भंडारा, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे,अहमदनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया, अमरावती, सिंधुदुर्ग, जळगांव जिल्ह्यातील येऊन ३१२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेतलेले आरोग्य अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांवर औषधी व प्रयोगशालेय तपासण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आरोग्यवर्धिनी या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत राज्यामधील सर्व १० हजार ६६८ उपकेंद्रे, ६०५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व १ हजार ८२८ ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अँड वेलनेस सेंटर) रूपांतर करण्यात येणार आहे

आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा 

प्रसूतीपूर्व व प्रसूती सेवा
नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा
बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा
कुटुंब नियोजन
संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रुगांची बाह्य रुग्ण तपासणी
संसर्ग जन्य रोग नियोजन व तपासणी
असंसर्गजन्य रोग व नियोजन व तपासणी
मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी
नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधीच्या सेवा
दंत व मुख आरोग्य सेवा
वाढत्या वयातील आजार व परिहरक उपचार
प्राथमिक उपचार
आपत्कालीन सेवा
आयुर्वेद व योग