fbpx

‘आदित्य ठाकरे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर सर्व पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत तर भाजप व शिवसेना यांमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं होणार यावरून सध्या चर्चा रंगली आहे.ठाकरे कुटुंबातून आजतागायत कोणीही निवडणूक लढलेली नसताना आता इतिहास बदलत असून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार व यंदाचे मुख्यमंत्रीही बनणार असा दावा संजय राऊत यांनी केला.

याआधी शिवसेना-भाजपमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय घेतला असताना आता आदित्य ठाकरे पाच वर्षं मुख्यमंत्री राहतील, आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे व ५ वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील असे वक्तव्य करून भाजप व शिवसेना याच्यात नवी वादाची ठिणगी राऊत यांनी टाकली आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवारांना बोलण्याचा अधिकार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  यावरून आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत व निवडणुकीला उभे राहण्यासाठी मुंबईतल्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान,आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे यांनी याआधीच दर्शवली आहे.