fbpx

#महापूर : महाराष्ट्रालासुद्धा अन्य राज्यांसारखी मदत मिळावी, आदित्य ठाकरेंची मागणी

सांगली : पुराचं संकट हे राष्ट्रीय आहे, तेव्हा केंद्राकडून, राज्याला मदत मिळावी, अशी अपेक्षा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची ठाकरे यांनी काल पाहणी केली. त्यावेळी इस्लामपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात कुठंही कोणतंही संकट आलं तर महाराष्ट्र पुढे असतो, तेव्हा महाराष्ट्रालासुद्धा अन्य राज्यांसारखी मदत मिळावी असं सांगून याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून लोकांनी सादर केलेल्या मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.

हरीपूर व ब्रम्हनाळ येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन मदत साहित्याचे वाटप आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे नेते व युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे – पाटील, खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशिल माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महापुराचा फटका सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला असून ब्रम्हनाळची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. असे सांगून अदित्य ठाकरे म्हणाले, पाणी ओसरले असून आता मदत कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. वीज बील माफी, पीक कर्जमाफी झाली आहे. पंचनामे गतीने सुरु आहेत. पडलेली घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधून देण्यात येतील. तोपर्यंत ग्रामीण भागासाठी 24 हजार व शहरी भागासाठी 36 हजार वार्षीक भाडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या