विरोधकांचे सोयीस्कर मौन; ‘आदिनाथ’च्या कामगारांचे प्रश्न जैसे थे.!

करमाळा- आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा थकलेल्या पगारींवर तालुक्यातील विरोधकांनी मौन व्रत घेतलेले असून कारखान्यातील कामगारांचे प्रश्न आजही जैसे थे आहे. शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर आवाज उठवणाऱ्या सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी या प्रश्नावर आश्चर्यकारकरित्या मौन बाळगले असून सध्या कामगारांच्या समोर जगायचं कसं हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याची आदिनाथ साखर कारखान्याच्या सुपरवाझरला मारहाण

आदिनाथ साखर कारखान्यावर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांच्या बागल गटाने  २००६ साली मोहिते-पाटील गटाचा दारूण पराभव करून आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर सत्ता आणली, त्यानंतर २०११ साली आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर युती करून दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली तर गेल्या वर्षी २०१७ ला तिसऱ्यांदा एकहाती सत्तेत येऊन हॕट्रिक साधली, सत्तेत येण्यासाठी मोठमोठया घोषणा करण्यात आल्या परंतु कारखान्यातील कामगारांचे भवितव्य आजही अंधारातच आहे त्याला कारण म्हणजे गेल्या ३१ महिन्यांपासून कामगारांच्या पगारी झालेल्या नाहीत कामगार रस्त्यांवर आलेला असून तीन वेळा सत्ता येऊन ही राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांचा बागल गट कामगारांचा प्रश्न सोडविण्यात अपयशी झालेला आहे. असे असूनही सध्या तालुक्यातील प्रमुख विरोधक शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, जि प अध्यक्ष संजय शिंदे तसेच तालुक्यातील भारतीय जनता पक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना,संभाजी ब्रिगेड आजही सोयीचे मौन पाळून आहेत .

मागे काही संघटनांनी यासाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता मात्र आक्रमकपणे कोणीही हा मुद्दा लावून धरला नाही. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधातील नेते मंडळींनी मते मिळविण्यासाठी या मुद्द्याचा वापर केला मात्र आता निवडणुका संपल्यानंतर सर्वच नेते शांत झाल्याचं चित्र आहे. आदिनाथ कारखान्याने गेल्या कित्येक वर्षांपासून कामगारांचा पगारी थकवलेल्या असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. सत्ताधारी तसेच विरोधकांच्या मौन व्रतामुळे कामगारांचे प्रश्न आजही जैसे थे आहेत.

करमाळ्याच्या राजकारणात ‘यंगब्रिगेड’ सक्रीय

उसाची पहिली उचल हमीभाव दरानुसार – सुभाष देशमुख