अंबाजोगाईत विनामास्क फिरणाऱ्या तरुणाने केली तहसीलदारांनाच शिवीगाळ

बीड: कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. परिस्थिती गंभीर असूनही काही नागरिक मात्र कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत बाहेर मोकाट फिरत आहेत. अशीच घटना अंबाजोगाई येथे घडली. विनामास्क आणि विनाकारण फिरणाऱ्या तरुणाला पथकाने अडवले असता तरुणाने थेट शिवीगाळ सुरु केली, त्यात तहसीलदारांनच तरुणाने शिवीगाळ केल्याची घटना येथे घडली आहे.

विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जबरदस्तीने अँटिजन चाचणी करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून बीड जिल्ह्यात सुरुवात झाली. मास्क न लावता फिरणाऱ्या दुचाकीस्वाराला पथकाने अडवले आणि अँटिजन चाचणी व दंडाची सूचना केली. यामुळे संतापलेल्या तरुणाने पथकातील अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत चाचणीला विरोध केला. ही घटना अंबाजोगाईतील सावरकर चौकात सोमवारी सकाळी घडली.

विनाकारण फिरणाऱ्यांवर अँटिजन चाचणी व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आले आहेत. यासाठी अंबाजोगाई शहरात पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी पावणेआठच्या सुमारास वेणुताई महिला महाविद्यालयासमोर तहसीलदार विपिन पाटील, मुख्याधिकारी अशोक साबळे व इतर अधिकारी व कर्मचारी अँटिजन टेस्ट ड्राइव्हची कार्यवाही करत होते. या वेळी प्रवीण राजाभाऊ शेप हा तरुण विनामास्क त्याच्या दुचाकीवरून सावरकर चौकाकडून येत होता. पथकाने त्याला अडवून अँटिजन चाचणी आणि विनामास्क असल्याने दंड भरण्याबाबत सूचना केली. त्यामुळे संतापलेल्या प्रवीणने सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, शासकीय कामात आडथळा निर्माण करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यावर दहशत निर्माण आणि अँटिजन चाचणीला विरोध केल्याप्रकरणी रमेश सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण शेपवर अंबाजोगाई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या