मराठा क्रांती मोर्चा : आणखी एका युवकाची नदीपात्रात उडी

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना औरंगाबादमधील एका युवकाने घेतलेल्या जलसमाधीनंतर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आणखी एका युवकाने नदीपात्रात उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलनादरम्यान कोरड्या नदीत उडी मारल्याने हा युवक जखमी झाला आहे. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील हा युवक असल्याचं समजतंय. ग्रामीण रुग्णालयात या युवकावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, गंगापूर येथील जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.