थर्माकोलवरुन तलाव पार करणाऱ्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

जालना: तालुक्यातील पीरकल्याण शिवारातील एक महिला थर्माकोलच्या साहाय्याने तलाव पार करत होती. यादरम्यान अचानक त्या पाण्यात पडल्या. सदर महिलेला पाण्यात पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

जालना तालुक्यात पीरकल्याण शिवारात तलाव आहे. या तलावाच्या बाजूला असलेल्या पीरकल्याण शेड भागात भोईवस्ती आहे. या भागातील नागरिक नागरिक शेडकडे येण्यासाठी येथीस तलावात थर्माकोलचा तराफा टाकतात व त्यावर बसून तलाव पार करतात. या परिसरातील रहिवासी सोनाली बावणे या सकाळी जेवणाचा डबा देण्यासाठी नेहमीच्या सवयीप्रमाणे तलावात थर्माकोलचा तराफा टाकून त्यावर बसल्या व तलाव पार करत होत्या. त्या वेळी अचानक त्या पाण्यात पडल्या व सोनाली यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज येथील स्थानिक नागरिकांनी वर्तवला आहे.

दरम्यान, बराच वेळ होऊनही सोनाली बावणे या शेडकडे परत आल्या नाही त्यामुळे नातेवाइकांनी तलावाकडे जाऊन पाहिले. तेव्हा नातेवाईकांना तराफा पाण्याच्या मध्यभागी दिसून आला. स्थानिकांनी पाण्यात शोध घेतला असता, सोनाली यांचा मृतदेह त्यांना आढळून आला. दरम्यान, या घटनेची माहिती स्थानीकांनी पोलिसांना दिली. तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत बागूल, कर्मचारी पठाण माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. यावेळी स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

महत्वाच्या बातम्या