महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक आगळीवेगळी भेट

aurangabad police

औरंगाबाद: शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये लवकरच सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी महिला दिनानिमित्त हा उपक्रम हाती घेतला.

मासिक पाळी आलेल्या महिला पोलीस अधिकारी ड्यूटीवर असताना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणीच मोफत सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या आरोग्याला त्याचा लाभ होईल, अशी संकल्पना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासमोर मांडली.

महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक ठाण्यात सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्याच्या त्यांच्या योजनेला पोलीस आयुक्तांनी तात्काळ मंजुरी दिली.आयुक्तांकडून हिरवा कंदिल मिळताच प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त अनिता जमादार आणि अन्य अधिकाऱ्यांना बोलावून याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश केले.

यासंदर्भात बोलताना उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, महिला दिनानिमित्त सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्याची संकल्पना पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आकारात येत आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी  हे आगळीवेगळी भेट ठरणार आहे.