राहत्यामध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक; भगवान शंकराचा मुकूट बनवून देणार मुस्लिम समाजाचे तरुण!

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील राहता शहराचे ग्रामदैवत विरभद्र महाराज मंदिरातील भगवान शंकर देवतेच्या चरणी राहता शहरातील मुस्लिम समाज बांधवांकडून लवकरच चांदीचा मुकूट अर्पण केला जाणार असल्याची माहिती मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने हाजी शफिक उर्फ मुन्नाभाई रफिकभाई शाह, हाजी इकबाल कालुभाई शेख व असिफ मुनसब शेख यांनी दिली आहे.

राहता शहराचे ग्रामदैवत विरभद्र महाराज मंदिरातून दोन-तीन दिवसांपूर्वी देवाचे चांदीचे मुकुट व इतर साहित्य चोरीस गेले आहे. चोरी झालेल्या वस्तू नव्याने बनवून देण्यासाठी अनेक दानशूर पुढे येत आहेत. यात मुस्लिम समाज बांधव सुद्धा कुठे मागे नाहीत. राहाता शहरातील व्यावसायिक हाजी शरीफ उर्फ मुन्नाभाई रफिकभाई शाह, हाजी इकबाल शेख व असिफ शेख या व्यावसायिक मित्रांनी एकत्रित येऊन समाज बांधवांशी संवाद साधून स्वखर्चाने मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने विरभद्र महाराज मंदिरातील भगवान शंकराच्या मूर्तीचा चोरीस गेलेला चांदीचा मुकुट नव्याने बनवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने आम्ही हा चांदीचा मुकूट देणार असल्याची माहिती मुन्नाभाई शहा यांनी विरभद्र देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ यांना दिली आहे. मुस्लिम समाज बांधवांनी नवीन चांदीचा मुकुट बनवून देण्यासाठी स्वच्छेने घेतलेला पुढाकार हा हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या ऐक्याचे दर्शन असून हिंदू मुस्लिम बांधवांमधील हा एक नवा आदर्श व जातीय सलोख्याचे उत्तम व प्रेरणादायी उदाहरण आहे.

महत्वाच्या बातम्या :-