मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला लागली भीषण आग

मुंबई : मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. त्यावेळी आग लागल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.

अनेक हाय प्रोफाइल लोक आणि व्यापारी या इमारतीत राहतात. या आगीत जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही आहे. जवळपासच्या भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीत किती लोक अडकले आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या