अयोध्या प्रकरणी पुनर्विविचार याचिका दाखल केलीच पाहिजे : मूलनिवासी मुस्लिम मंच संघटना

blank

टीम महाराष्ट्र देशा : अयोध्या प्रकरणाचा निकाल लागून आठ दिवसच झाले आहेत. अशातच ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुनर्विचार याचिका दाखल करण्यासोबतच बाबरी मस्जिदच्या जागे ऐवजी पाच एकर जमीन मोबदल्यात न घेण्याचा ठराव करण्यात आला आहे.

या ठरावाचे मूलनिवासी मुस्लिम मंच संघटनाने समर्थन दिले आहे. या निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची कायदेशीर संधी उपलब्ध असताना पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय योग्य आहे. तसेच याचिकाकर्त्यांचा हा संविधानिक अधिकार असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले आहे.

राम जन्मभूमी- बाबरी मस्जिद निकालाचे देशातील अनेक बुद्धिजीवी व न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व वरिष्ठ वकील वरीष्ठ पत्रकार यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. वास्तविक पाहता बाबरी मस्जिद बाबर यांचे कमांडो मीर बाकी यांनी 1528 साली बांधली होती. त्यानंतर सन 1857 ते 1949 पर्यंत बाबरी मस्जिद चे अस्तित्वही होते. 16 डिसेंबर 1949 रोजी पर्यंत त्या मशिदी मध्ये नमाज पठण करण्यात येत होते, या सर्व बाबी ही सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आहेत. अशी माहिती इनामदार यांनी दिली.

त्याचप्रमाणे, 22 व 23 डिसेंबर 1949 रोजी मध्यरात्री काही समाजकंटकांनी मस्जिद मध्ये भगवान श्रीरामांची मूर्ती ठेवण्याचे काम केले. त्यानंतर सन 1992 साली कार सेवकांनी बाबरी मस्जिद जमीनदोस्त केली. असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याची माहिती निकालातून पुढे आली आहे. या सारखे असे अनेक प्रश्न त्या निकालातून पुढे येत आहे जे खूप गंभीर बाब आहे.

दरम्यान,  अगदी निकाल येण्याच्या काही दिवसांपूर्वी काही समाजकंटक संघटना सातत्याने केंद्र सरकारवर दबाव टाकत असल्याचा आरोपही इनामदार यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने अध्यादेश आणून राम मंदिर उभारावे, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यासारख्या अनेक संघटना व त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघटना दंगलीचे व भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याच्या शक्यताही मुस्लिम मंच संघटनाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी वर्तविली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :