पोलीस भरतीसाठी युवक आणि युवतींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अनेक फेर बदल करण्यात आले आहेत. या फेर बदलांविरोधात आज पुण्यात पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक युवक आणि युवतींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा मुठा नदीच्या पात्रातून सुरु झाला व जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. ही सारी मंडळी ११ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत.

पोलीस भरतीच्या प्रक्रियेत २ मोठे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी पोलीस भरतीसाठी २०० गुणांची चाचणी घेण्यात येत असे. यामध्ये १०० गुणांची लेखी तर १०० गुणांची मैदानी चाचणी असायची. आता राज्य सरकारने यामध्ये बदल केले असून लेखीपरीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे गुण १०० वरुन ५० गुणांवर आणून ठेवली आहे. या दोन बदलांन विरोधात आज या युवकांनी मोर्चा काढला होता.

गेली अनेक दिवस झाले राज्य सरकारकडून फक्त रिक्त पदासाठीच भरती होत आहे. पण नवीन भारती मात्र झालेली नाही. पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता या युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.