तुंग पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी रुपये निधीची तरतूद – सदाभाऊ खोत

सांगली: तुंग गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी, 38 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. ही पाणीपुरवठा योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजबिलाचा मुद्दा निर्माण होणार नाही. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून मंजूर आहे. या योजनेचा लाभ कसबे डिग्रज या गावालाही होणार आहे, असे प्रतिपादन  कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले. मिरज तालुक्यातील तुंग आणि कसबे डिग्रज येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,तुंग गावातील पाणीपुरवठा योजनेबरोबरच कवठेपिरान या गावासाठीही मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या दोन्ही पाणीपुरवठा योजना पुढील 15 वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आल्या आहेत. दोन्ही योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.  ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणींचे निराकरण ग्रामस्तरावर होणे अपेक्षित आहे. यासाठी गाव पातळीवरच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत. त्यांच्याशी संवाद साधावा. यासाठी आठवड्यातून एकदा मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश देऊन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, तुंगमधील महावितरण विभागाच्या थकित प्रकरणांचा आढावा घेऊन, समस्यांचे निराकरण करा. याचा अहवाल आठवडाभरात सादर करा. नियमानुसार वीजबिल आकारणी करा. थकित प्रस्तावांना आठ दिवसात  वीज जोडणी द्या, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच महसूल विभागाने तुंग येथील थकित वारस नोंदी त्वरित घ्याव्यात. गावातील रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून हाती घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खराट म्हणाले, मिरज तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वारस नोंदीची 350 प्रकरणे निर्गत केली आहेत. तुंगमधील प्रलंबित प्रकरणे तलाठ्यांनी एकत्रितरीत्या सादर करावीत. पुढील 15 दिवसात नोटिशीची कार्यवाही करून, प्रकरणे मार्गी लावली जातील.   राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने मिरज तालुक्यात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांनी आपआपल्या अडचणी मांडल्या. यामध्ये उपसा सिंचन योजना वीजबिल, नळजोडणी, वीजजोडणी, वारस नोंदी, पाणंद रस्ते, रस्ते, पाणीपुरवठा, घरकुल योजना, मागेल त्याला शेततळे, जलस्वराज्य प्रकल्प, प्रधानमंत्री मुद्रा योजना, शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रार, उपसा सिंचन योजना आदिंबाबत ग्रामस्थांनी प्रश्न मांडले.

यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य मान्यवरांच्या हस्ते पांडुरंग पाटील यांना कर्ज नसलेबाबतचा दाखला वितरित करण्यात आला. यावेळी महावितरण भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

You might also like
Comments
Loading...