कडकनाथ जातीच्या कोंबडीची पिल्ले देण्यासाठी १० लाखांची तरतूद

Kadaknath-Chicken-farming

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोडव्यवसाय करण्यासाठी सेस फंडातील कडबाकुट्टीसाठी तरतूद असणारे १० लाख रुपये कडकनाथ जातीच्या कोंबडीची पिल्ले देण्यासाठी वर्ग करण्याचा निर्णय पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नाव संपर्क क्रमांकाचे फलक आठ दिवसांमध्ये दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीची बैठक सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कडबाकुट्टी खरेदीसाठी १० लाखांची तरतूद होती. पण राज्य कृषी विभागातर्फे कडबाकुट्टी वाटप करण्यात येते. त्यामुळे झेडपीच्या सेस फंडातील १० लाखांची तरतूद कडकनाथ जातीच्या कोंबडीची पिल्ले खरेदी करण्यासाठी वळवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. सोलापूुरातील तापमानात कडकनाथ जातीच्या कोंबड्यांची चांगली पैदास होते. त्याद्वारे शेतीला जोड व्यवसाय मिळत असल्याने ती पिल्ले वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेळीगट वाटपासाठी ४० लाखांच्या तरतुदीची सूचना अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिल्याने त्याबाबतचे नियोजन सुरू आहे. शेळ्यांच्या किमती वाढल्याने १० शेळ्या एक बोकडऐवजी पाच शेळ्या एक बोकड देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय केंद्र आयएसआे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.