सुतक युगांचे फिटले… दलित युवकाला खांद्यावर बसवून मंदिरात नेले वाजत-गाजत

a-priest-carries-a-dalit-man-on-his-shoulders-into-the-temple

टीम महाराष्ट्र देशा- देशभर सध्या दलितांवरील अत्याचारांबद्दल मोठी चर्चा सुरु आहे. कट्टरपंथीय मंडळींकडून अन्याय अत्याचार केल्याच्या नेहमीच बातम्या येत असतात. असं असलं तरीही जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी अनेक मंडळी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. कुणी मेळावे घेतात तर कुणी जनजागृती करतात. मात्र जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी हैदराबादमधील चिल्कुर बालाजी मंदिराच्या पुजाऱ्यांनी नुकतंच जे पाऊल उचललं आहे त्याचं संपूर्ण देशभर कौतुक केलं जात आहे.

हैदराबादमधील चिल्कुर बालाजी मंदिरात यापूर्वी दलितांना प्रवेश देण्यात येत नव्हता. इच्छा असून देखील दलितांना बाहेरूनच देवाचे दर्शन घ्यावे लागत असे. चिल्कुर बालाजी मंदिराचे पुजारी सीएस रंगराजन यांना हि गोष्ट नेहमी खटकत असे. या मंदिरात 3,000 वर्षांपूर्वी दलित युवकाला खांद्यावर बसवून मंदिरात घेवून जाण्याची प्रथा होती. या प्रथेला ‘मुनि वाहन सेवा’ असे संबोधले जात असे.

हीच प्रथा पुन्हा सुरु करण्याचा पुजारी सीएस रंगराजन विचार करत होते. अस्पृश्यता कमी करायची असल्यास मंदिरात प्रवेश देणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांना जाणवत असे. यातूनच त्यांनी पुन्हा एकदा हि प्रथा सुरु केली आणि एका दलित युवकाला चक्क आपल्या खांद्यावर बसवून मंदिरात वाजत गाजत घेऊन गेले. सनातन हिंदू धर्माची महानता आणि समाजातील सर्व वर्गांपर्यंत समानतेचा संदेश देण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे पुजारी सीएस रंगराजन यांनी माध्यमांशी सांगितले.

ज्या युवकाला प्रातिनिधिक स्वरुपात मंदिरप्रवेश देण्यात आला त्या युवकाचा आनंद गगनात मावेना.आदित्य पारासरी असं या दलित युवकाचे नाव असून माध्यमांशी बोलताना महबूबनगर नगरमधील हनुमान मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. मात्र आता ज्या पद्धतीने प्रवेश देऊन सन्मान करण्यात आला त्याबद्दल समाधान व्यक्त करताना आगामी काळात अजून बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला. भेदभावाची मानसिकता कमी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देखील दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी लढा दिला होता. २ मार्च १९३० ला बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह केला तर सावरकरांनी जातिभेद तोडण्यासाठी स्नेहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला.