छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर

श्रीपाद छिंदम

अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला आणखी एक दणका देण्यात आला. आज महापालिकेत छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तसेच छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.

श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्याची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला होता. त्यानंतर छिंदम ची महापौर पदावरून वर नगर भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली.

भाजप गटनेते दत्ता कावरे यांनी मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी अनुमोदन दिलं. यावेळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला. या महासभेला शिवसेनेचे नगरसेवक काळे कपडे तर नगरसेविका काळ्या साड्या परिधान करून सभागृहात दाखल झाल्या होत्या. शिवसेनेच्या नगरसेवकांनी जयघोष करत शिवाजी महाराजांचा पुतळा सभागृहात आणला.