केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक, तिहेरी तलाक विधेयकावर होणार चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली येथे आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकी मध्ये तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तिहेरी तलाक बंदीविरोधात नव्या विधेयकाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या काळात तिहेरी तलाक हे विधेयक संसदेत मांडण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक पारित होऊन राज्यसभेत गेले. मात्र राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित राहिले. त्यामुळे मोदी सरकारचा पहिला कार्यकाळ संपल्या नंतर तिहेरी तलाकचं विधेयक संपुष्टात आलं. म्हणून आज होणाऱ्या बैठकीत तिहेरी तलाक या विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. १७ जून पासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. १७ व्या लोकसभेचे हे पहिलं अधिवेशन असणार आहे.

दरम्यान तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेची संमती मिळाली होती; पण राज्यसभेत याआधीही ते मंजूर झाले नव्हते. त्यामुळे मोदी सरकारने त्याचा वटहुकूम काढला होता. सरकारला दोनदा असा वटहुकूम काढावा लागला. आता त्याची मुदत ३ जून रोजी संपली आहे.