हिंदुत्व आणि विकास दोन्हींमध्ये मोदी सरकार अपयशी- तोगडिया

तोगडिया याचं नरेंद्र मोदींना खुलं पत्र

टीम महाराष्ट्र देशा- ‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हिंदुत्ववाद्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेच आहे, पण विकासाची आश्वासनं पाळण्यातही कमी पडलं आहे,’ अशी थेट टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते व मोदी यांचे संघ परिवारातील कडवे टीकाकार प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.असं असलं तरीही तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहित त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. यासाठी तोगडिया यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.बऱ्याच काळापासून आपल्या दोघांमध्ये मनापासून चर्चा रंगली नाही. १९७२ ते २००५ या काळात जशा चर्चा व्हायच्या तशी चर्चा झाली नाही असे तोगडिया यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

तोगडिया यांनी मोदींना लिहलेल्या पत्रातील प्रमुख मुद्दे

  • देशासंबंधी किंवा गुजरात संबंधीच्या अनेक प्रश्नांवर आपण एकत्र येऊन काम केले आहे. आपले दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे, एकमेकांच्या कार्यालयात जाणे, खेळीमेळीने सोबत राहणे तुम्ही विसरला नसाल याची मला खात्री आहे. चहापानाच्या वेळी किंवा एकत्र जेवणाच्या वेळी रंगलेल्या चर्चांचाही तुम्हाला विसर पडला नसेल. तुम्हाला मी कायम मोठ्या भावाप्रमाणे मानले आहे.
  • मैत्री आणि मोठ्या भावाच्या नात्यानं आपल्यात यापूर्वी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा व्हायची. वेळप्रसंगी आपण एकमेकांच्या पाठिशी उभे राहायचो. पण २००२मध्ये जेव्हा गुजरातमध्ये हजारो हिंदूंना तुरुंगात टाकले गेले, पोलिसांच्या गोळीबारात ३००हून अधिक हिंदू मारले गेले, तेव्हापासून आपल्यात दुरावा आला.
  • विकासासाठी हिंदूंना अपमानित करण्याची गरज नाही. दोन्ही गोष्टी एकावेळी होऊ शकतात. मात्र, त्यासाठी चर्चा व्हायला हवी. गोरक्षकांना गुंड म्हणून हिणवणं, देवालयाआधी शौचालय असं सागणं, काश्मिरात जवानांवर दगड मारणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणं, आर्थिक धोरणं बदलून हजारो लोकांचे रोजगार हिसकावणं हा विकास नाही.
  • सरकार लोकांचा आवाज दाबतंय, अशी देशातील जनतेची भावना होऊ लागली आहे. लोकांनी तीन वर्षांहून अधिक वाट पाहिली. आता त्यांचा संयम तुटला आहे. मोठमोठ्या जाहिरातींनी आणि उत्सवी सोहळ्यांनी व्यक्तिगत प्रतिमानिर्मिती होऊ शकते. पण देशाला त्याचा उपयोग नाही. लोक या साऱ्याला विटले आहेत.
  • निवडणुका जिंकणं हा केवळ टक्केवारी, मतदारनोंदणी व ईव्हीएम मशिनचा खेळ आहे. मात्र, निवडणुका जिंकल्यावर लोकांना दिलेली आश्वासन पाळणं महत्त्वाचं असतं. तसं करणारा नेता ‘प्रजा लक्षी’ म्हणून ओळखला जातो.
  • भाई, कृपा करून सत्तेच्या प्रवाहात वाहून जाऊ नका. सत्तेची धुंदी बरी नाही. राष्ट्रबांधणीसाठी त्याचा काही उपयोग होत नाही. माझ्या पत्राला सरकारी पोच मिळणार नाही. पण एक दुरावलेला मित्र फोन उचलून भेटीसाठी बोलवेल, अशी आशा आहे.
You might also like
Comments
Loading...