तारकर्लीतील स्कुबा डायव्हिंग सेंटरला पॅडी संस्थेमार्फत पंचतारांकित प्रमाणपत्र

मुंबई  : तारकर्ली (जि. सिंधुदुर्ग) येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरला आज प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इनस्ट्रक्टर्स (पॅडी) या संस्थेमार्फत पंचतारांकित दर्जाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या संस्थेचे प्रादेशिक प्रशिक्षण सल्लागार रॉबर्ट स्कॅमेल यांनी याबाबतचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना प्रदान केले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) चालविल्या जाणाऱ्या तारकर्ली येथील स्कुबा डायव्हींग सेंटरला पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. डायव्हिंग प्रशिक्षणातील पॅडी ही जगातील एक नामांकित संस्था आहे. जगभरातील १८० देशातील स्कुबा डायव्हिंग सेंटर्सना पॅडी संस्थेमार्फत अधिस्वीकृती प्रदान करण्यात येते.

तारकर्ली येथील स्कूबा डायव्हिंग सेंटर येथे साहसी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने व्रेक डायव्हिंग, वॉल डायव्हिंग आदी प्रकार चालविले जातात. देशात फक्त ५ ठिकाणी स्कूबा डायव्हिंग सेंटर आहेत. त्यापैकी तारकर्ली हे महाराष्ट्रातील एक सेंटर आहे. एमटीडीसीसारख्या शासकीय संस्थेमार्फत चालविले जाणारे ते देशातील एकमेव सेंटर आहे. तसेच पॅडी संस्थेने पंचतारांकित दर्जा दिलेले देशातील हे एकमेव सेंटर आहे.

You might also like
Comments
Loading...