fbpx

धक्कादायक : मुलाशी फोनवर बोलली म्हणून पित्याने कुऱ्हाडीने तोडली

टीम महाराष्ट्र देशा : चंद्रिका शिकायला घरापासून दूर होती पण आपला १८ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या खुशीत घरी आली होती. तिची एक चूक फक्त एवढीच झाली की ती आपल्या एका मित्राशी फोनवर बोलली. आणि खोट्या इभ्रतीपायी जन्मदात्या पित्याने आपल्या पोटाच्या गोळ्याला कुऱ्हाडीने तोडले.

एका बापाने आपल्याच १८ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची आंध्रप्रदेश येथील कृष्णा जिल्ह्यात घटना घडली आहे. तोंडेपु कोटैया असं या माणसाचं नाव असून त्याची मुलगी चंद्रिका ही बी. फार्माची विद्यार्थिनी होती.

ही घटना घडली त्या दिवशी ती फोनवर बोलत होती. तोंडेपु याने तिचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याला ती प्रेमसंबंधात असल्याचा संशय आला आणि तो संतापला. रागाच्या भरात त्याने घरात असलेली कुऱ्हाड घेतली आणि तिच्यावर वार करत तिची हत्या केली.

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तोंडेपुवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. तोंडेपुने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात आपला गुन्हा कबूल केला. मुलगी प्रेमात पडली तर आपली अब्रु जाईल या भीतीने तिची हत्या केल्याचं त्याने या जबाबात म्हटलं आहे.